पहिलं दान विठ्ठलाला

 

कित्येक गोष्टी आपल्याला मनापासून करायच्या असतात. पण काही केल्या त्या घडतच नाहीत. मला पंढरपूरला जायचं होतं पण तो योग कांहीं केल्या येत नव्हता. वारकरी, त्यांचा “ गजर हरिनामाचा”, त्यांचे विठ्ठल भेटीसाठी आतुरतेने पुढे पुढे जाणारे जथ्थे याबद्दल मला तीव्र कुतूहल होतं. घरदार सोडून त्याच्या नामस्मरणात गुंतून जात, सर्व कष्ट सहन करीत ही एवढी माणसे ज्या विठ्ठलाच्या दर्शनाला जातात त्याचं दर्शन मलाही घ्यायचं होतं. इथे जवळपास असलेल्या विठ्ठल मंदिरांमध्ये नव्हे, पंढरपूरच्या त्या जनीच्या, नामाच्या, तुकोबांच्या विठ्ठलदर्शनाला जायचं होतं. वारीचा हा जो चमत्कार दर वर्षी घडतो, तो घडवणाऱ्या विठ्ठलाला भेटायचं होतं. तिथे असं काय आहे विशेष याचं कोडं उलगडायचं होतं. वारीला जाणं शक्य नव्हतं पण पंढरपूरला जमेल तेव्हा जायचं असं मनाशी म्हणत असताना तो योग जुळून आला.

पंढरपूर तसं जुनं क्षेत्र! आसपासची जुनी घरं, वाडे, मंदिराच्या दाराशी असलेली  दुकानांची दाटी, पूजेची सामग्री घ्या म्हणून मागे लागणारी माणसं, तशीच गजबज, तुळशीचे भरगच्च हार घेऊन धावणारी मुलं, लोकांची वर्दळ, सगळं असं कुठल्याही क्षेत्राच्या ठिकाणचा पुन:प्रत्यय घडवणारं ! आडवार होता त्यामुळे रांग फार मोठी नव्हती. पाऊण तास उभं राहिलं की दर्शन होईल असं वाटत होतं. सगळ्यांजवळ तुळशीचे हार होते. तुळशीचा किंचित तिखट पण तरतरीत गंध, फुलं उदबत्त्यांचा दरवळ असा संमिश्र गंध दाटला होता. आमच्या पुढे एक वयस्क जोडपं होतं. गृहस्थाचं थोडसं मळकट मुंडासं, धोतर, आणि वर जीर्ण असा सदरा. नऊवार नेसलेली त्याची साधीशी बायको……त्यांचे डोळे मात्र कसल्याशा आनंदाने चमकत होते.खाली सभागृहात बायकांनी रिंगण धरलं होतं. त्यांची भजनेही चालली होती. मागे खांद्यावर भगवा झेंडा घेतलेले एक गृहस्थ! त्यांच्याजवळ एकतारीही होती. ते मला म्हणाले,” अहो ताई, हजार तीर्थक्षेत्रांचा महिमा या पावन ठिकाणी आहे. मी वारीही करतो आणि अधूनमधून लहर लागली की उठून येतो त्याला भेटायला!” मी सहजच त्याला म्हटलं,” खूप पुण्य जोडलत की भाऊ.”त्यावर ते म्हणाले,” हरी म्हणा हरी म्हणा | मुखाने हरी म्हणा | पुण्याची गणना | कोण करी ||” अचानकच रांगेतील सगळे जण उत्स्फूर्तपणे म्हणाले पुंडलीक वरदा हाssरी विठ्ठल ….विठ्ठल विठ्ठल श्री हरी विठ्ठल त्यांचा तो एकसमयावच्छेदे  होणारा गजर हळू हळू शांत होत गेला. आणि पुढल्या मुंडासेवाल्याने म्हटले ,” ज्ञानोबा माऊली तुकाराम “ त्या ठेक्यावर सगळी रांग परत गजर करू लागली त्यांचं ते तल्लीन होणं पाहून मला स्वत:बद्दल विषाद  वाटला. मी अशी तल्लीन का होऊ शकत नव्हते? पुढे सरकता सरकता आम्ही थेट विठ्ठल मूर्तीसमोर आलो. सात आठ जण होतो. विठ्ठलमूर्ती अगदी प्रसन्न होती. वातावरण शांत होतं पण कसली तरी उर्जा तिथं भरली होती. मुंडासेवाल्या म्हाताऱ्याने हात जोडत म्हटलं,” विठ्ठला… वारीला न्हाई आलो पर आज दर्शन घडलं देवा.” त्याचा आवाज सद्गदित झाला होता, अंग कापत होतं, डोळ्यात पाणी होतं. त्याच्या बायकोचे डोळे मिटले होते. ती इतकी स्तब्ध होती की खरी ती तिथे नाहीच असं वाटत होतं. वातावरण भक्तीच्या संवेदनेने  भारलेलं होतं. विठ्ठलाकडे बघता बघता तिथे तेज दाटून आल्यासारखं झालं. मकर कुंडले, कटी पितांबर, माथ्यावर मुकुट असलेला तो तिथे तसाच उभा होता. क्षणभर माझ्या आत काहीतरी वेगळं घडलं होतं.सगळे विचार, सगळा कोलाहल, निमिषमात्र शांत झाला. झरझर एक प्रसन्नपणा आत भरू लागला. इतक्यात, पुजाऱ्याच्या सूचना सुरु झाल्या,” पुढे सरकून घ्या .“ मी भानावर आले तरीही ती अवस्था पुसटपणे मनात रेंगाळत होती. मी कोपऱ्यात सरकले पण तिथून हालावसं वाटेना पुजाऱ्याचा तगादा सुरु होता. माझी अवस्था ओळखल्यासारखा तो मुंडासेवाला म्हणाला, “ चला ताई “ रखमाईला भेटायचय नव्हं?”  हो तिलाही भेटायला हवं होतं.मन प्रसन्न झालं होतं. अंतर्बाह्य शुचिर्भूत झाल्यासारखं वाटत होतं. विठ्ठ्लाचं गारुड काय असतं त्याचा अनुभव क्षणार्ध का होईना आला होता.

 

          

 

 

 

19 Comments:

    • डॉ कविता पांढरकर

      पंढरपुरी विठ्ठलाच्या दर्शनाची अनुभूती 🙏🙏🙏

    • उमा नाबर

      माधवीताई विठ्ठलाला साोक्षात भेटवलंत की.मन अगदी भरून आलं तिथं जाणार्यांना तो कसा आपला वाटतो ते कळतं.माझा योग केव्हा येतो भेटायचा ते पाहू .तोपर्यं बोलावा विठ्ठल हेच खरं.इरावतीबाईंच्या लेखाची आठवण मनात ताजी झाली.माझा बॉयफ्रेंड विठ्ठल.

      • धन्यवाद उमाताई
        काल आलात बरं वाटलं मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अन्य शाखांमधून इतर कुणीच नव्हतं तुम्हालाही पंढरपूरला जाण्याचा योग लवकरच येईल

    • धन्यवाद डॉक्टर

  1. va Madhavitai kiti sunder ani pavitryane, bhaktine chimb karnara anubhav aahe ha. Mihi ajun Pandharpurla gele nahi. Manat anekda yet, javasahi vatat. pan kuthalyahi goshticha yog yava lagato. tyamule mi ajibat nirash zalelei nahi. Vitthalala malahi bolvavas vatel. Tumchya ‘pahil dan Vitthalala’ madhun tumchya satwik, nirmal ani pavitra manatil bhaktibhav janavala ani khup bhavla. Pandharpuras n jatahi tithal drshya dolyasamor ubh rahil.manapasun Dhanyvad !!
    asech Blog lihun amhala anand dya.

    • धन्यवाद मृदुलाताई
      तुम्हालाही दर्शनाचा योग लवकरच येईल मग तुमच्या अनुभवात मला सहभागी करून घ्या

  2. अविनाश ताडफळे

    ब्लॉग लिहिण्याची इतकी सुंदर भावपूर्ण सुरवात प्रथमच पाहायला मिळाली. तुमच्या पुस्तकांप्रमाणे तुमच्या ‘ब्लॉग’चे गारुडही वाचकांच्या मनावर सतत राहील याची खात्री आहे.

    • धन्यवाद अविनाशजी
      काल तुम्ही दोघे अगत्यपूर्वक आलात याचा फार आनंद झाला पहिल्याच प्रयत्नाला तुमच्यासारख्या साक्षेपी लोकांची पसंती मिळाली याचं समाधान वाटलं

      • अविनाश ताडफळे

        कार्यक्रम खूपच छान झाला. सोनेपे सुहागा म्हणजे शेवटी तुमच्या नातवाने म्हटलेले पसायदान !

  3. खुप सुंदर अनुभव😊अिभनंदन. 😊

  4. खूपच छान ताई.
    अभीनंदन.
    एकनाथ आव्हाड

  5. गौरी कुलकर्णी

    माधवीताई,मंनभरून अभिनंदन.
    याचि देही याचि डोळा
    देखिला विठू सावळा
    अशी साक्षात अनुभूती तुमच्या या लेखातून मला आली

    • गौरी तुला आवडलं याचा आनंद झाला धन्यवाद

      • Devadatta Mone

        This is what differentiates men from boys. Amazing what you saw and are able
        to verbalize. You have a gift of creating a virtual reality for your readers.
        I can attest to that because I was there and reading your blog brought back
        those wonderful memories. Some people can paint others can sing but
        you do “Shabda Chitre” like no one else.
        (I have yet to figure out how to write Devnagari)

        • तू त्या वेळी होतास. पण प्रत्येकाला विठ्ठल वेगळ्या तऱ्हेने जाणवला असणार सगळं आपल्या त्या वेळच्या भावावस्थे वर अवलंबून असत तरीही वातावरण भारलेलं असलं तर अर्धाक्षण आपण विचार रहित होऊ शकतो तेवढा आनंदाचा काळ असतो याचा अनुभव प्रत्येकाला कधी न कधी आलेला असतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *