नित्यनूतन

नवीन घरात रहायला आल्यावर माझी प्रभात फेरी गच्चीवर करायची असं मी ठरवलं.पहिल्या दिवशी पहाटे वर गेले. आणि चहूकडे नजर फिरवताच पहाटसौंदर्य मनात झरू लागलं. पूर्वेला क्षितीज अबोली रत्नरसात नहात होतं. विरळ ढगांच्या मागे सूर्यबिंब लपलं होतं तरी ढगांमधून किरणांचे झोत प्रस्फुटित होऊन त्यांचा फिकट सोनेरी गुलाबी पिसारा आकाशात पसरला होता त्या प्रकाशात काही तेज मंदावलेल्या निळसर चांदण्या लुकलुकत होत्या. सोनसळी घट्ट पाकळ्यांच्या फुलांचा ताटवा रसरसून फुलावा तसे किरणांनी माखलेले ढगांचे बुन्दके पश्चिमेला फुलारले होते. एक छोटासा निळ्याशार पंखांचा पक्षी किलबिलत होता. निळसर जाम्भळ्या आकाशावर गर्द हिरवे माड नक्षी कोरत होते. त्यांच्या झावळ्यांचे झुले करून काही मैना मजेत झुलत होत्या. रस्त्यावरून फिरताना असं खूप सारं आकाश कधी नजरेत भरतच नाही.

दुसऱ्या दिवशी आकाशाच्या फलकावर वेगळाच देखावा चित्रित झाला होता. एखादं पारदर्शी वस्त्र दूरवर पसरत जावं तसा ढगांचा लांबलचक पट्टा लहरत होता लालसर, गुलाबी, सोनेरी मोत्यांची आभा असलेल्या प्रकाशमान रंगांचं देखणं वैभव त्याला लाभलं होतं. जाम्भळ्या फुलांनी गजबजून गेलेले दोन तामिणीवृक्ष कोवळ्या उन्हाची शाल पांघरून एकमेकांशी गप्पा मारत असल्यासारखे उभे होते. अचानक त्यांच्यावरून पोपटांचा थवा सुसाट निघाला. त्यांचे हिरवेकंच पंख आणि लांबलचक पोपटी पिसाऱ्यांच्या रेघा हिरव्या रंगछटांची विजचित्रे रेखाटत क्षणात नाहीसा झाला.मागे उरले ते त्यांच्या शुकशब्दांचे नाद. खरं तर ते नादही उरले नव्हते पण त्यांचा आभास रेंगाळत होता.

मला रवीन्द्रनाथ टागोरांचं म्हणणं आठवलं. रोजचा दिवस नित्य नूतन असतो वेगळ्या सौंदर्याचं दान पदरात टाकत असतो. तसंच तर घडत होतं. गच्चीवरची प्रभातफेरी फारच आनंददायी ठरत होती पण अचानक एक दिवस वेगळंच घडलं आदल्या दिवशी माझा कुणाशी तरी वाद झाला होता.त्याचं सावट मनावर पसरलेलं होतं. मन त्याच विचारात गुंतलेलं होतं. उतारवयात एखादी लहानशी गोष्ट सुद्धा मनाला फार लागते की काय कुणास ठाऊक! त्याचं सूक्ष्मं असं दु:ख मनाला सलत रहातं. तर्काला ते पटत नसतं. पण भावनांची तर्कबाह्य ताकद वाढलेली असते. स्वत:ला कितीही समाजावलं तरी त्या भावावस्थेचा हलकासा थर मनावर पसरलेला असतो. त्यामुळे गच्चीवर फेऱ्या मारताना त्या प्रसंगांची, त्या शब्दांची आवर्तनं मनात फेर धरून होती.  मन त्यात इतकं गुंतलेलं की आकाशाकडे लक्ष गेलं नाही. झाडं, फुलं, पांखरं, हवेचा थंड स्पर्श काहीच जाणवलं नाही. खाली कर्कश्श हॉर्न वाजवत एक ट्रक गेला त्याच वेळी झाडावरचे कावळेही कलकलाट करत एकदम आकाशात उडाले. मी दचकून भानावर आले. एव्हाना सूर्य आकाशात बराच वर आला होता. पहाटेचं ते वेगवेगळ्या अंगानं फुलणारं सौंदर्य लुप्त झालं होतं. ती आनंदवेळ निघून गेली होती.

त्याक्षणी माझ्या एकदम लक्षात आलं की जी गोष्ट घडून गेली होती, जी  मागे फिरून पुन्हा नव्याने घडवता येणार नव्हती, जी म्हटलं तर क्षुल्लक होती तिचा विचार करीत मी हातात असलेली आनंदवेळ गमावली होती. जे कृष्णमुर्ती यांचं म्हणणं आता थोडसं का होईना समजल्यासारखं वाटत होतं. भूतकाळ हा मृत काळ असतो. त्याचं प्रत्यक्ष अस्तित्व संपलेलं असतं. त्यात डोकावत राहणं म्हणजे त्या वेळेपुरतं  मरण पत्करल्यासारखं असतं. त्या प्रदेशात जाऊन काळ गमावला आणि जीवनाचा एक अंशही गमावला असं होतं. कारण जो काळ गेला तो जगण्यातून वजा झाला.

क्षणभर मस्तक भिरभिरल्यासारखं झालं. आपण भूतकाळ किती प्रेमाने जतन केलेला असतो. त्या जुन्या अनुभवांमधून तर आपण शिकतो. आपलं ज्ञान संचितातून येतं नाही का? आपल्या स्मृती, नाते संबंध आपल्याला संजीवनी देणाऱ्या आठवणी, एखाद्या गोष्टीचा सराव करताना मागल्या कृतीचं भान ठेऊन त्याहून अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न या साऱ्या गोष्टी भूतकाळाशी संलग्न असतात.स्मृती भूतकाळातच रुजलेली असते. ती जर गमावली तर माणसाचं जगणं संदर्भहीन होऊन जातं. कितीही झालं तरी भूतकाळ हा आपल्या जागून झालेल्या आयुष्याचा भाग असतो. आपला इतिहास आपल्या अभिमानाचा विषय असतो. आपल्या सामान्य जगण्यातून भूतकाळ संपूर्णपणे वगळणं नाही जमणार. तरीही नित्य परिवर्तनीय जगात प्रत्येक क्षण नित्य नूतन असतो त्यावर शक्यतो कसलीही छाया पडू न देता तो जगायला हवा. निदान तसा प्रयत्न करायला हवा याचं भान ज्या क्षणी माझ्या मनात निर्माण झालं, त्या क्षणाची मी ऋणी आहे.

2 Comments:

  1. डॉ कविता पांढरकर

    सोनेरी क्षणांची सोबत अनुभवली

    • मेधा
      तुला साहित्याची आवड आहे आता छान लिहू लागली आहेस तुझी प्रतिक्रिया आवडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *