प्रत्येक क्षण आनंदाचा

 

 

 

प्रत्येक क्षण आनंदाचा

भूतकाळ हा मृतकाळ आहे त्यात डोकावून बघू नये असं कितीही म्हटलं तरी वय ज्येष्ठतेनुसार स्मरणरंजन नकळता प्रत्येक घटना प्रसंगाला चिकटलेलं असतं. एरवीही नुसतं बसल्यावर व्यक्तींची, घटना, प्रसंगांची चलतचित्रे मनाचा केव्हा ताबा घेतात कळतही नाही. त्यातही गम्मत अशी असते की त्रासदायक, फजितीचे, चुकांचे, अपमानाचे प्रसंग अगदी ठळकपणे अग्रक्रमाने आठवतात.एखाद्या व्यक्तीने दहा चांगल्या गोष्टी केल्या असतील तरी एखादी न केलेली गोष्ट आठवते. त्याचा एक झाकोळ मनावर धरतो. तो गडद होत जातो. आणि मग,” मी इतक्या लोकांचं इतकं केलं पण माझ्याशी कुण्णी कुण्णी म्हणून चांगलं वागलं नाही. मी कमनशिबीच! मला माणसं धार्जिणी नाहीत.” असे आत्मदयेचे विचार मनात घोटाळू लागतात.ते विचार एकीकडे दु:ख कुरवाळत असतात त्याने दु:खावर मऊ हात फिरतो. थोडं बरं वाटतं त्यामुळे आणखी तसेच घटना प्रसंग आपोआप मनात जागे होतात. त्या साऱ्या मुळे तात्पुरतं बरं वाटत गेलं तरी मनात मागे कुठेतरी त्याची मुद्रा नव्याने उमटते. अशा मुद्रांची संख्या वाढत जाते. मग तात्पुरतं बरं वाटणं केव्हा नाहीसं होतं आणि अस्वस्थता ,राग  चीडचीड मनात भरू लागते ते कळतही नाही. जगण्यातला अवघा आनंद शोषला जाऊ लागतो.

सकाळी उठल्यापासून अशी मनोवस्था असेल तर त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टींमधून वेगळे अर्थ काढू लागतो. म्हणजे मुद्दामून काढत नाही. मनाच्या त्या अवस्थेत ते तसेच अर्थ जाणवतात. एखादा माणूस आपल्याकडे पाहून हंसला तरी आपली जुनी काही परिस्थिती आठवून तो उपहास करतोय असं वाटतं. मग आपल्याकडून त्याला थंड प्रतिसाद दिला जातो. असा प्रतिसाद दिला की समोरचा माणूस अस्वस्थ होतो.त्याला अस्वस्थ बघितलं की आपल्याला आत कुठेतरी समाधान वाटतं. त्या माणसाला बिचाऱ्याला हा कार्य कारण भाव कसा समजणार? त्याला बोलायचं असलं तर संवादाचा कोंब तिथेच खुरटून जातो. नात्याचा जो काही लहान मोठा पूल असेल आपल्यात आणि  त्याच्यात त्यात लहानशी पडझड झालेली असते. पुढल्या  वेळी तो जेव्हा आपल्याला भेटतो त्या वेळी आपण चांगल्या मनोवस्थेत असलो तर आपल्याला आपल्या मागच्या विचित्र वागण्याची आठवण नसते त्यामुळे आपण त्याला बघून प्रसन्न हसतो. त्याची मोकळेपणी चौकशी करतो. पण आपल्या मागच्या वेळेच्या थंड प्रतिसादाची आठवण त्याच्या मनात जागी असते त्याला थोडं अपमानास्पद वाटलेलं असतं. आपल्याशी कसं वागायचं याचे काही एक आडाखे त्याच्या मनाने त्याच्याही नकळत बांधलेले असतात. त्यामुळे तो औपचारिकपणे हसतो जरा बेताबेताने हातचं राखून बोलतो. आता संवाद नीट होत नाही आपल्याला त्याचं आणि त्याला आपलं वागणं उमगेनासं होतं. नात्याची पडझड चालूच राहते.

वयज्येष्ठतेच्या अवस्थेत आणखी एक गोष्ट घडते. आपले अपमान, दु:खद गोष्टी, अपयश यांच्या बरोबरच आपल्या भूतकाळातील चुका नको इतक्या आठवतात. त्यांची उगाच टोचणी लागून राहते. त्या नाकारण्यासाठी मन काही बचावात्मक भिंती बांधू लागतं. आपल्याभोवती खोट्या बडेजावाचे डोलारे उभारायचे, दुसऱ्याने न केलेल्या चुका रंगवून सांगायच्या, आपण काही गोष्टी सोयीस्कर रीत्या विसरायच्या, समजा आपल्या हातून घडलेली चूक ऐकणाऱ्याला माहित असली तर दुसरा कोणी त्याला कसा जबाबदार होता ते सांगायचं. यामुळे तात्पुरतं बरं वाटलं, स्वप्रतिमा उजळल्यासारखी वाटली तरी अंतर्यामी ती टोचणी असतेच. यामुळे वागण्यात विसंगती येऊ लागते.

म्हणून आला क्षण आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला तर हे असे गुंते होणार नाहीत. त्यांच्या गाठी त्रास देणार नाहीत. चुका, अपमान, अपयश, कर्तव्य अपुरं राहणं, मोह, क्रोधाच्या भरात दुसऱ्याला दिलेला मनस्ताप, स्वार्थापायी हातून घडलेली वाईट कृत्ये हे सर्व घडून गेलं, जागून, भोगून झालं. आता तो काळ पुन्हा परतून येणार नाही. त्यात अडकून रहाणं म्हणजे पुढलं आयुष्य व्यर्थ घालवण्यासारखं आहे.प्रत्येक सकाळ नवी, तो दिवस नवीन काही घेऊन येतो त्यात आपण काही नवीन घडवू शकतो.याचं भान आलं की जगण्यातला त्रास वजा होऊ लागतो. आपण आनंदी हसतमुख असलो की इतराना आपण हवे हवेसे वाटू लागतो. निदान त्रासदायक नक्कीच वाटत नाही

शारीरिक दुखण्यांचा काळ कठीण असतो. इतराना आपल्यासाठी वेळ नसला तर त्रागा उपयोगाचा नसतो. समोर येणारा आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण दुसरा कुणी आपल्यासाठी नाही जगू शकत. हे एकदा लक्षात आलं की मनात स्वीकार उद्भवतो. आला क्षण उत्स्फर्तपणे जगलो तर पुढलं जगणं सुसह्य होतं मजेचं होतं या वास्तवाचं भान आलं की आनंदी जगण्याकडे वाटचाल होऊ लागते.

 

10 Comments:

  1. ज्योती कपिले

    आनंदमयी माधवीताई 👍👌

  2. उन्नती गाडगीळ

    गतं न सोच्यं !
    छानच ! उद्बोधक
    उन्नती गाडगीळ 🙏

  3. अविनाश ताडफळे

    आज बऱ्याच दिवसांनी तुमच्या ‘ब्लॉग’वर आलो, ह्या वर्षीच्या पहिल्या पावसाची (दुसऱ्यांदा) मजा अनुभवली आणि आणखी मागची दोन पाने वाचली व गतस्मृतींच्या सकारात्मकतेने व नकारात्मकतेने मनात गोंधळ उडाला. खरच, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे नकारात्मक स्मृतीच जास्त काळ राहतात व जास्त वेळा वर्तमानात डोकावतात. ह्यावर तुम्ही सांगितलेला उपाय करणेही नेहमी जमतेच असे नाही. असे प्रत्येकाचेच होत असेल का?

    • ब्लॉग वाचलात याबद्दल आभार
      नकारात्मक स्मृती जीवाला लागल्या असतात त्या चटकन आठवतात असं बऱ्याच लोकांच्या बाबतीत घडतं त्यावर आपलं perception आपल्यालाच सुधारून घ्यावं लागतं

  4. MADHAVITAI TUMCHE VICHAR, TUMCH LIKHAN BARACH KAHI SAKARATMAK DEUN JAT.
    PRATYEK VYAKTEET GOON V DOSH ASTAT. TASE TE AAPLYATAHI AAHET. MHANUNACH AAPAN JAR DUSRYATALYA CHANGALYAA GOONANKADE JAR LAKSHYA KENDRIT KELE TAR APOAP AAPALE VICHAR SAKARATMAK BANTAT ASE MALA PRAKARSHANE VATATE ANI MAZA TASA ANUBHAVAHI AAHE. MHANUN ASEL KADACHIT MALA VAIT MANAS KADHI BHETATACH NAHIT.

  5. Tumcha blog khupach avdla ani patala dekhil. Vachun Khup kahi shikayla milal. Ya prasangatun apan jat asto yala kasha padhatine baghaych hi sakaratmak drushti milali.

    • कविता तुला माझं कौतुक आहे पाठच्या बहिणीसारखं ! त्यामुळे धन्यवाद म्हणत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *