हंगामा है क्यौ बरपा

हंगामा है कयौं बरपा
अलीकडे पाउस बोलतो माझ्याशी. माझ्या खोलीला भिंतभर काचेची खिडकी आहे. पाउस पडायला लागला की मी लेखन वाचन बाजूला ठेवून लहान मुलासारखी पाउस बघत बसते. त्यालाही वाटत असेल “बरी आहे रिकामटेकडी जरा गप्पा मारायला.” रिमझिम येतो तेव्हा खिडकी पूर्ण उघडते. त्याच्या थेंबांचा नाजूक शिडकावा चेहऱ्यावर झाला की तो जलस्पर्श जाणवतो. जिवंत असतो तो! त्यातून किती तरी स्पर्श जागे होतात. माझ्या पहिल्या मुलाचा जन्म झाला. तेव्हा वेदना थांबल्या तरी खूप दमले होते. त्यावेळी आईने असाच हात फिरवला होता चेहऱ्यावरून. नवऱ्याचं कौतुक असच असायचं. त्यात ममत्वाबरोबर मोहोरून जावं असं अधिक काही मिसळलेलं असे. आणि मुलाने मांडीवर खेळताना अजाणता चेहऱ्याला लावलेला हात ! किती कोमल ! मन प्रेमाने उचंबळून यायचं. कोणतं ही बक्षीस मिळालं की आजीनं चेहऱ्यावरून फिरवलेला हात आणि मग ओवाळून टाकलेल्या मीठ मिरच्या ! या आठवणी याव्यात असं सगळं काही त्या तुषारस्पर्शात नसेलही. पण एखादा फोटो पाहिला की अनेक आठवणींचे दिवे उजळतात की नाही? तसाच त्या थेंबांचा हात चेहऱ्यावरून फिरला की हे स्पर्श जागे होतात. आपण त्यात रमलेले असताना हा धाडधाड कोसळायला लागतो.रागाने खिडकी बंद करायला गेलं की हसून म्हणतो,” काय त्याच त्याच आठवणी उगाळायाच्या? आत्ता बघ काय मजा मजा करतोय ! आणखी बघ ! मग अंगात आल्यासारखा अविराम कोसळ ! झाडं आडवी होतात का काय असा वारा ! माणसं भिजल्या पाखरांसारखी दुकाना बिकानांच्या वळचणीला अंग चोरून उभी ! हजार कंठरवांमधून आल्यासारखा पर्जन्याघोष ! माजावर आलेले हत्ती वाटेतील सारे काही तुडवीत सुसाट धावावे तसा कोसळ ! ”अंगात आलय बाबा तुझ्या ! किती वैतागलेत सगळे ! मद्यधुंद माणसासारखं तुझं वेडंवाकडं हुंदडणं पुरे आता” असं म्हणून खिडकी बंद करणार एवढ्यात म्हणाला,” हंगामा है क्यौं बरपा? थोडीसी तो पी है| डाका तो नहीं डाला| चोरी तो नहीं की है|” नाही म्हटलं तरी गुलाम अलींचे सूर मनात जागे झाले. चो—री—तो—प्रत्येक अक्षरावर नजाकतदार मुरकी, सुरातील लडिवाळपणा, दर्द सगळं आठवलं आणि मग अनेक गाण्यांची झडच लागली मनात ! श्रावणात घन निळा बरसला, पाउस कधीचा पडतो, ती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादात होता, गरजत बरसत सावन आयो रे, जिंदगीभर नाही भूलेगी वो बरसात की रात, आया सावन झूमके आणखी कितीतरी…….सुरांचे ताटवे फुलून आले मनात ! खाली गाड्यांचे हॉर्न केकाटू लागल्यावर मी म्हटलं,” बघ किती वैताग आणलायस आता रस्त्यांवर खड्ड्यांची नक्षी काढलीच असेल” तर म्हणाला,” ए पोरी “
म्हटलं,”पोरी काय पोरी? मी पोर दिसतेय?” त्यावर म्हणाला,” हो माझ्या लेखी पोरच ! मी तर आदिम आहे तरीही तरूण ! दोस्ती आहे म्हणून तू काहीही बोलशील तर नाही ऐकून घेणार ! खड्डे कोणामुळे पडतात ते शोध जरा ! बरं जाऊ दे. नाही तरी चहा भज्यांचा ब्रेक घेणारच होतो.”
किती स्वाद जागे झाले मनात ! आईचा स्पेशल पुदिनावाला मिंट टी ! पावसात भिजल्यावर डोकं पुसता पुसता घेतलेले वाफाळते घुटके. कॉलेजमध्ये नाटकाची प्रॅक्टिस संपल्यावर मंत्रालयापुढे असलेल्या समुद्रावर अख्ख्या गँगने जाऊन पावसात भिजत घेतलेला अद्रकवाला कटिंग सोबत मक्याची कणसं आणि धमाल मस्ती. नवऱ्याबरोबर गाडीतून पावसातली लाँग ड्राईव्ह आणि टॉक ऑफ दी टाऊन मध्ये बसून समुद्राकडे बघत तुषारांचे पिसारे बघत घेतलेली कॉफी किंवा मैत्रिणीं बरोबर महालक्ष्मीचं दर्शन घेउन मग खालच्या हॉटेलात खाल्लेली मुगाची भजी आणि मासाला चाय !
लहान मुलांच्या खिदळण्याचा आवाज आला पाहिलं तर खड्ड्यात साठलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडणं चाललं होतं त्यांच्या मा अम्मा आई वगैरे ही टाळ्या पिटत होत्या. एक चिमणी एका उथळ खड्ड्यात पंख फडफडवत नाचत होती. आणखी एक खड्ड्यात पेट्रोलच्या तवंगानी इंद्रधनुष्यी रंग सांडले होते. ते सगळं सुंदर निर्मळ होतं. पाउस म्हणाला,” बघ खड्डे पण सुंदर केले की नाही?” माझं लहानपण आठवता आठवता मी म्हटलं, “ हो रे बाबा आहेसच तू ग्रेट !”

One Comment:

  1. अविनाश ताडफळे

    मस्त!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *