स्नेहपत्र.

स्नेहपत्र
….. कुटुंबियांकडून……

तसे तर शब्द जिवाभावाचे सखेसोबती
श्वासोच्छवासाइतके मला निकट क्षणोक्षणी
शब्दांच्या आधारानेच सोसत आले आजवर
प्रत्येक आनंद आघात आयुष्यातली अधिकउणी
शांताबाई शेळके यांचे हे शब्दांबद्दलचे भाष्य आमची लाडकी माधवी मामी,आजची प्रतिथयश लेखिका माधवी कुंटे हिच्या लेखनसंदर्भात चपखल लागू पडते. मराठी भाषेवरील प्रेम व प्रभुत्व, साहित्याची आवड, वाचन आणि लेखन हे तिच्या जगण्याचे अविभाज्य भाग आहेत.
आपली शाळेतील नोकरी सांभाळून हळूहळू तिचा लेखनप्रवास सुरु झाला. माहेर, स्त्री, चारचौघी, मिळून साऱ्याजणी अशा अनेक नामवंत मासिकांमधून तिच्या कथा छापून येऊ लागल्या. प्रत्येक लेखकाला हवे असलेले वाचकांचे प्रेम तिला भरभरून मिळू लागले. लोकप्रियता उदंड मिळाली. कथा कादंबऱ्या उत्कृष्ट अनुवाद मुलांसाठी बालसाहित्य ललित लेखसंग्रह वैचारिक लेख अशा विविधांगी लेखनाबरोबर तिने संपादनही केले. तिला मिळालेले अनेक पुरस्कार ही तिच्या उत्तम लेखनाची पोचपावतीच आहे. तिचा हा लेखनप्रवास आज अमृत महोत्सवाकडे वाटचाल करतो आहे. या सर्वाचा आम्हा कुटुंबियांना अभिमान व कौतुक आहे.
निवडक माधवी कुंटे ( कथामाधवी ) या पुस्तकाची निर्मिती हा लेखिका म्हणून तिचा आलेख उंचावत गेल्याची साक्ष आहे.आधुनिक युगाशी सांगड घालत तिची वेब साईटही प्रसिद्ध झाली त्यात तिच्या सर्व साहित्य कर्तृत्वाचा आढावा घेतला गेला आहे.म्हणजे आता madhavi kunte on one click !
शब्दासवे मी जन्मले शब्दासवे मी वाढले असे म्हणत लेखनप्रवास करता करता आज ती प्रतिथयश लेखिका झाली आहे. लेखन वाचनाने तिला जीवनातील आघात सोसण्याची ताकद दिली. आणि आनंदाने जगण्याची ऊर्मीही दिली. तिच्या साहित्य निर्मितीला मानाचा मुजरा!
असेच लेखन उत्तरोत्तर तिच्या हातून घडो . लोकप्रियता आणि पुरस्कार वाढत राहोत तिला निरामय आनंदी आयुष्य लाभो ही शुभेच्छा
….. कविता पांढारकर

माधवीताईंना ……..
तिच्या मनाचा गाभारा
अनुभवता आतून
नित्य ऐकू येते तिथे
शुद्ध सात्विकाची धून
तिच्या लिहित्या बोटाना
फुटे आशेची पालवी
देई अंधारवाटांना
दिशा प्रकाशाची नवी
नाही बेगडी मुलामा
हार तूऱ्यांचा न सोस
दिसामाशी लिहिण्याचा
अनंताचा हा प्रवास
निरामय तळ्याकाठी
जसा ओंकार व्यापून
तिच्या सोबतीस तसा
गुणगुणतो श्रावण
शब्दगंधातून तिच्या
दरवळे सोनचाफा
तिथे हवाच कशाला
ढोलनगाऱ्यांचा ताफा
………गौरी कुलकर्णी

One Comment:

  1. अविनाश ताडफळे

    अगदी खरं आहे, विशेषत: त्यांच्या वेब साईटमुळे आत्ता त्यांच्या मनात चाललेले विचार वाचायला मिळतात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *